Shri Dasram Maharaj Kelkar

श्रीअण्णा महाराज

श्रीअण्णा महाराज

प.पू.सदगुरू श्री चंद्रशेखर रामराय केळकर तथा श्रीअण्णामहाराज म्हणजे प.पू. सद्गुरू श्रीदासराममहाराज केळकर यांचे जेष्ठ चिरंजीव. यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५ (पांडवपंचमी) दि. २३-१०-१९४४ रोजी झाला.

लौकिकार्थांने त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. नंतर त्यांनी सांगली शिक्षण संस्थेच्या कार्यालयात ऑफीस सुप्रिटेंडंट म्हणून आदर्श पद्धतीने जबाबदारीने विशेष ठसा उमटवत ३५ वर्षे सेवा केली. सर्व संचालकांची, स्टाफची व इतर संबंधित लोकांची लीलया मने जिंकली. स्वावलंबन, चिकाटी, वेळेचा काटेकोरपणा, नोंद टिप्पणे ठेवण्याची शिस्त अशी त्यांची कार्यपद्धती आजही अनेकांना मार्गदर्शक ठरते.

श्रीअण्णामहाराज यांना पितृदेव श्रीदासराममहाराज यांचा अनुग्रह होता. त्यानुरूप अखेरवर त्यांनी कीर्तनाबरोबर साधनही साधले.

अतिशय नम्रपणा, सचोटी, व्यवहारदक्षता, सव्यासाचित्व, मृदू बोलणे, अखंड आनंदी व उत्साही, प्रसन्न चेहेरा, आपुलकी, जिव्हाळा, अबालवृद्धांशी कौशल्याने सुसंवाद व अंतर्बाह्य निर्मळ अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती.

सर्वांचे नम्रतेने स्वागत, आगत्य, पाहुणचार, तितकेच सर्व संतमहात्मे सर्व सांप्रदाय यांचे विषयी प्रेम, पारदर्शकपणा हेही आदर्शवत होते. परमार्थासाठी,  भक्तहितासाठी व भक्तकल्याणासाठी श्रीअण्णामहाराज यांनी शेवटपर्यंत देह झिजवला.

श्रीदासराममहाराज यांच्या अखंड कीर्तनामध्ये श्रीअण्णामहाराज यांनी पेटीची समर्थ साथ केली.त्यांची समयसुचकता, पाठांतर आणि गायन उत्कृष्ठ होते. त्यामुळे सहाजिकच त्यानी श्रीदासराममहाराज यांनी देह ठेवल्यानंतर आपल्या घराण्यात सुरु असलेली अखंड कीर्तनाची परंपरा सुरु ठेवली व अनेक अडचणी येऊन सुद्धा सर्वांवर मात करून कीर्तनव्रत अखंड १९ वर्षे चालविले. त्यांच्या कीर्तनात श्रीमामामहाराज, श्रीदादामहाराज यांच्या कीर्तनात येणारे अनेक दाखले येत असत.त्यांचे कीर्तन हे भावभक्तीपूर्ण, करुणरसपूर्ण व सहज सोपे असे. कीर्तनाचा रंग हा खूपच अपूर्व असे.

श्रीदासराममहाराज यांचेपासून सुरु असलेली अन्य ठिकाणची प्रवचन सेवाही श्रीअण्णामहाराज यांनी शेवटपर्यंत संभाळली.

शेवटी त्यांना श्वासाचा त्रास वाढल्यामुळे दवाखान्यात दाखल करावे लागले. पण जाणेचे आधी त्यांनी नेमाचे कीर्तन केले. दिनांक २३-०९-२०२० अधिक आश्विन शु. ७ रोजी त्यांनी सदगुरू अनुसंधानात देह ठेवला.