Shri Dasram Maharaj Kelkar

भ.स.श्री. मामा महाराज केळकर

भ.स.श्री. मामा महाराज केळकर

श्रीगोविंद अनंत तथा श्री मामा महाराज केळकर यांचा अवतार पवित्र अशा केळकर कुळामध्ये श्रीअनंतराव व सौ.राधा यांचे पोटी फाल्गून शु १० शके १८१० या शुभ दिवशी शहापूर ग्रामी गोठाणामध्ये झाला. गोठाणामध्ये अवतरले म्हणून त्यांचे नाव 'गोविंद' असे ठेवण्यात आले. ते जन्मजात विरक्त हरिभक्त होते. देवाचे नामस्मरण करणे , भजन करणे , हेच त्यांचे लहानपणीचे छंद होते. संतदर्शनाची आवड ही त्यांना बालपणापासूनच होती.

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे दर्शनास बुधगाव रेल्वेस्टेशनवर श्रीमामामहाराज गेले होते. बालवयातील मामा महाराजांना, महाराजांना पाहून साक्षांत 'आई' भेटल्याचा आनंद झाला. त्यांनी महाराजांच्या कंबरेला मिठीच मारली.महाराजांनी मामांच्या पाठीवरुन हात फिरविला व म्हणाले, 'आईवडिलांचे ऐकावे बरं का बाळ, रामाला जावे, रामाचे तीर्थ घ्यावे'. एवढे बोलून ते थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले , 'हा मुलगा पुढे महासाधू होईल, दिगंत किर्तीमान होईल'.

श्री. मामा महाराजांचे त्यावेळच्या पध्दतीप्रमाणे लग्नाचे वय झाल्यावर वडिलांनी त्यांचेमागे लग्नाचा लकडा लावला. लग्न केले तर हातून परमार्थ होणार नाही म्हणून लग्न न करावे, असे त्यांचे मनात होते. शेवटी यावर तोडगा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विचारुन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे निर्णय घ्यावा, असे दोघांनीही मान्य केले. मामा महाराज आळंदीला गेले. ज्ञानेश्वर महारांजाचे समाधीसमोरील पारावर या हेतूने ज्ञानेश्वरीपारायण त्यांनी आरंभिले. या बालभक्ताची तळमळ पाहून समाधीतून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले व त्यांनी "बाळ, तू आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे प्रपंच करुन परमार्थ करतुला योग्य गुरुंची गाठ पडेल व तुझा प्रपंचात परमार्थ पुरा होईल", असा आशिर्वाद दिला.

ज्ञानेश्वर महाराजांच्या आशिर्वादाप्रमाणे मामा महाराजांचा विवाह कागवाडच्या फाटक घराण्यातील श्री नागेशराव फाटक यांची सुलक्षणी कन्या.चि.सौ.कां. रंगुताई इचेबरोबर थाटात पार पडला. विवाहानंतर चि.सौ.का.रंगुताईचे नाव 'सौ.इंदिरादेवी' असे ठेवण्यात आले. या दांपत्याचे पोटीच पुढे १९२० मध्ये श्रावण वद्य ६ या शुभदिवशी महान विष्णुभक्त श्रीदासराम महाराज अवतीर्ण झाले.

सन 1900 पासून सांगलीमध्ये भ.स.तात्यासाहेब महाराज कोटणीस यांनी नित्यकीर्तनास सुरुवात केली होती. श्री. मामा महाराजांचे ठिकाणी उपजत असणा-या कीर्तनप्रेमामुळे त्यांनी नित्यकीर्तननिष्ठ भ.स.तात्यासाहेब महाराजांकडे अनुग्रहाची याचना केली. पण त्यांनी तुमचे पूर्वनियोजित सदगुरु नारायणमहाराज चिमड गांवात आहेत, त्यांचा अनुग्रह तुम्ही घ्यावा, असे सांगितल्याने, श्रीमामामहाराजांनी भ.स.नारायणमहाराज यांचेकडून माघ व. २ शके १८२८ (सन१९०६) या दिवशी साधन मार्ग समजून घेतला. सदगुरुकृपेने अहोरात्र साधन साधून आपले जीवन-साधन अहंकारविरहित करुन धन्यता प्राप्त करुन घेतली "आणिक येक समाधान | मी पणे विण साधन | करु जाणे तोचि धन्य | समाधानी ||" हे समर्थ वचन अनुभविले.

श्री. मामा महाराज केळकरांचे ठिकाणी असणारी कीर्तननिष्ठा श्री. नारायण महाराजांचे कृपेने त्यांनी केलेले साधन, हे श्री भ.स.तात्यासाहेब महाराजांना ज्ञात असलेने, अखंड कीर्तनसेवेचे त्यांचे व्रत माघ व ३ शके १८४६ या दिवशी स्वत: देह ठेवलेला असतानासुध्दा , मध्यरात्री दासबोधपारायण प्रसंगी प्रत्यक्ष सगुणरुपात प्रगट होऊन मामामहाराजांचे स्वाधीन केले. श्री. मामा महाराजांना हरिकीर्तनागुग्रह प्राप्त झाला. "असो ऐसे सकळही गेले | परंतू येकचि राहिले |जे स्वरुपाकार जाले | आत्मज्ञानी ||" या समर्थोक्तिचा प्रत्यय आला."जो साधन करील. त्यावरच खरी कृपा होईल" हे त्यांचेच उद्गार त्यांनी सत्य करुन दाखविले.श्री निळोबारायांची तळमळ पाहून सदेह वैकुंठगमन केलेले असतानासुध्दा तुकाराममहाराजांना परत यावे लागले.तितकीच ही गोष्ट महत्वाची आहे.

मामा महाराजांनी परमार्थ आचरणात आणला व मग आमच्यासाठी मार्गदर्शन म्हणून त्यांचे परमार्थविचार अमृतवाणी, रामपाठ, श्रीहनुमदगुरुचरित्रबोधसार या ग्रंथात शब्दबध्द करुन ठेविले.

गुर्वाज्ञेप्रमाणे श्री. मामा महाराजांनी ३८ वर्षे एकही दिवस खंड न होता अखंड , भ.स.तात्यासाहेब महाराजांची सेवा म्हणून कीर्तनसेवा केली. मी कीर्तन करतो हे त्यांच्या गावीही नव्हते. "दासा हदयी हनुमान | सदा करी तो कीर्तन ||" हा त्यांचा अनुभव होता.त्यांनी आयुष्य कीर्तनीभूत केले.सतत अखंडीतचाचेने श्रीराम स्मरण केले व सच्चिदानंद ही पदवी प्राप्त करुन घेतली. याची प्रचिती श्रीमामामहाराजांनी देहांती आणून दिली. शेवटच्या दिवशी देहाच्या नाडया लागत नाहीत, अशा अवस्थेत संध्याकाळी ५ या त्यांच्या कीर्तनाचे वेळी 'श्रीराम जयराम जयजयराम' या त्यांच्या महामंत्राचा त्यांनी मोठ्यांदा गजर केला. नित्यकीर्तन साधले. याही वेळी अखंडितवाचेने श्रीरामस्मरण सुरु आहे, याची साक्ष दिली. "हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती | देहत्यागाअंती हरी बोला ||" हे नाथमहारांजाचे वचन सत्य करुन दाखविले.

श्री. मामा महारांजाचे निर्याणानंतर त्यांच्या आज्ञेने त्यांची ही नित्यकीर्तनाची परंपरा त्यांचे अधिकारी चिरंजीव श्री. दासराम महाराज केळकर यांनी तितक्याच निष्ठेने कीर्तनसेवेची खूणगाठ बांधून ३९ वर्षे वृध्दिंगत केली. आजही तीच परंपरा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रशेखर आण्णा तितक्याच निष्ठेने गेली ११ वर्षे चालवित आहेत. ही नित्यकीर्तनांची परंपरा या केळकर कुळात अशीच "यावच्चंद्र दिवाकरौ" चालावी अशी प्रार्थना भ.स.निंबरगीकरमहाराज, भ.स.तात्यासाहेब महाराज कोटणीस, भ.स.मामामहाराज केळकर, भ.स.दासराममहाराज केळकर यांचे पवित्र चरणी करतो.